घोणसरी (ता. कणकवली) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घोणसरी ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम – एकाच दिवशी पाच वनराई बंधाऱ्यांचे यशस्वी बांधकाम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रभावी अंमल करत घोणसरी ग्रामपंचायतीने एकाच दिवशी पाच वनराई बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण करून जलसंधारण क्षेत्रात एक आदर्श उभारला आहे. या उपक्रमामुळे गावातील भूजल पातळी स्थिर ठेवण्यास मोठी मदत होणार असून आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ सरपंच श्री. प्रसाद राणे, ग्रामपंचायत सदस्य सौ. प्राची प्रमोद राणे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सिद्धेश गोसावी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. अशोक राणे, माजी सरपंच श्री. दत्ताराम गुरव, श्री. विलास मराठे, सहाय्यक कृषी अधिकारी सौ. हुले, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच उमेद बचत गटांच्या सर्व महिला सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
उपक्रमाच्या यशस्वीतेत ग्रामस्थ, महिला, युवक आणि बांधकाम कामगारांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत मोलाचे योगदान दिले. समुदायाच्या एकत्रित सहभागामुळे जलसंवर्धनाची गावातील जाणीव आणि बांधिलकी अधोरेखित झाली.
वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनासाठी पाण्याचा आधार मिळेल. जलसंधारणाबाबत ग्रामपंचायतीने दाखविलेला हा दूरदर्शी दृष्टिकोन पदाधिकाऱ्यांनीही कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.
याशिवाय, पुढील आठ दिवसांत आणखी पाच वनराई बंधारे आणि चार कच्चे बंधारे बांधण्याचे नियोजन ग्रामपंचायत प्रशासनाने आखले असून संबंधित कामे नियोजित गतीने राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जलसंधारण हा मूलभूत आधारस्तंभ असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. घोणसरी ग्रामपंचायतीने हाती घेतलेला हा उपक्रम गाव विकासातील आदर्श मॉडेल म्हणूनही पाहिला जात आहे.
