घोणसरी ग्रामपंचायतीत मोफत दंत व मुखरोग तपासणी शिबिर

 

घोणसरी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग : ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत घोणसरी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या माध्यमातून मोफत दंत रोग व मुखरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

१३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ग्रामपंचायत घोणसरी येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

शिबिरामध्ये दातांचे विविध आजार, हिरड्यांचे विकार, तोंडाचे अल्सर व तोंडाशी संबंधित इतर विकारांची तपासणी करण्यात आली. तसेच दातांची स्वच्छता, योग्य निगा आणि आवश्यक उपचारांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

यासोबतच उपकेंद्र घोणसरीच्या माध्यमातून ३० वर्षांवरील नागरिकांची बीपी व शुगर तपासणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांना दंत आरोग्यासोबतच सर्वसाधारण आरोग्य तपासणीचीही सुविधा एकाच ठिकाणी मिळाली.

“आरोग्याची काळजी घ्या, निरोगी आयुष्य जगा!” या संदेशातून आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामस्थांना वेळेवर आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.

घोणसरी ग्रामपंचायतीच्या या आरोग्यविषयक उपक्रमामुळे “माझा गाव – आरोग्य संपन्न गाव” या संकल्पनेला चालना मिळाली असून, ग्रामस्थांच्या आरोग्य संवर्धनासाठी ग्रामपंचायत सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे.