८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिवंगत सरपंच कै. मॅक्सी पिंटो यांच्या पत्नी श्रीमती सोबिन पिंटो यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

 

घोणसरी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग : ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घोणसरी ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि अभिमानास्पद वातावरणात संपन्न झाला. यावेळी दिवंगत सरपंच कै. मॅक्सी पिंटो यांच्या पत्नी श्रीमती सोबिन पिंटो यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

एकल महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांच्या संघर्ष, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेचा सन्मान करण्याचा सामाजिक संदेश ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला. या उपक्रमातून महिलांच्या सन्मानासोबतच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समान स्थान देण्याचा ग्रामपंचायतीचा सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला.

ध्वजारोहणावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ तसेच मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिक, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या सर्वांचे स्मरण करण्यात आले.

“ध्वज राष्ट्राचा… सन्मान महिलांचा…” या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम घोणसरी ग्रामपंचायतीच्या सामाजिक बांधिलकीचे आणि महिला सन्मानाचे प्रतीक ठरला.